मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये समस्त
हिंदुत्त्वनिष्ठ संघटना एकवटल्या !
मर्दानी खेळ, रणरागिणी पथक, बालकक्ष,पारंपरिक वाद्ये, पालखी आदींतून हिंदु संस्कृतीचा अविष्कार
मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर
मुंबई – अखंड हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची संकल्पना मांडून ती साकार करण्यासाठी समस्त हिंदूंना संघटित करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी 7 मे या दिवशी वयाची 76 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने संपूर्ण भारतभर हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर आणि स्मारकांची स्वच्छता, स्वसंरक्षण विषयक शौर्य जागरण शिबिरे, राष्ट्र आणि धर्म जागृतीविषयक व्याख्याने यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अभियानाचा एक भाग म्हणून 20 मे या दिवशी दुपारी 4.30 वाजता हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. भारतमाता चौक, लालबाग ते संत भालचंद्र महाराज मैदान, चिंचपोकळी अशी ही दिंडी काढण्यात आली. लाठी-काठी, दंडसाखळी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, लेझीम-ढोल आदी पारंपरिक वाद्यांचा गजर, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कार्यरत असलेले रणरागिणी शाखेचे पथक, संस्कृती रक्षणाचे आवाहन करणारा बालकक्ष, आपत्काळात अत्यावश्यक सेवेची जाणीव करून देणारे प्रथमोपचार पथक यांसह विविध संप्रदाय, संघटना, स्थानिक मंडळे यांचे शेकडो धर्मप्रेमी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या दिंडीमध्ये सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत समिती, श्रीराम मंदिर धारावी, वज्रदल (धारावी), श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी), हिंदू राष्ट्र सेना, बजरंगदल, तामिळ सेवा संघ, दुर्गाशक्ती महिला आत्मसुरक्षा संघ यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असे शेकडो धर्मप्रेमी दिंडीत सहभागी झाले होते.
धर्मध्वजाचे पूजन करून शंखनादाने दिंडीला प्रारंभ झाला. या वेळी दिंडीच्या अग्रभागी असलेल्या ग्रामदेवता श्री मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालख्यांचे पूजन करण्यात आले. दिंडीमार्गात ठिकठिकाणी सुवासिनींनी दिंडीचे औक्षण करून पालखीचे पूजन केले. धर्मप्रेमी नागरिकांकडून दिंडीवर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. दिंडीच्या मार्गात अनेक ठिकाणी रांगोळी काढून दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीमध्ये सहभागी धर्मप्रेमींनी राष्ट्र आणि धर्म विषयक सुवचनांचे फलक हाती धरले होते.
संत भालचंद्र महाराज मैदानात आल्यावर दिंडीचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. ब्रिजेश शुक्ला आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रियरित्या सहभागी होण्याचे आवाहन केले. मान्यवरांच्या भाषणानंतर ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम’ असा जयघोष करत दिंडीची सांगता करण्यात आली.
डॉ. उदय धुरी, मुंबई प्रवक्ता
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्र. 9967671027)

