बीडमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या
प्रतिनिधी: संदिप कसालकर
बीड - परभणी तालुक्यातील जिंतूर शहरातील खैर प्लॉट भागात राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेने आपल्या दवाखान्यातील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. डॉ. मीरा सानप (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सानप दाम्पत्य हे मुळचे बीड जिल्ह्यातील असून व्यवसायानिमित्त ते जिंतूर येथे स्थायिक झाले होते.
डॉ. मीरा सानप (३२) यांच लग्न २००६ या वर्षी बीड येथील डॉ. गणेश सानप यांच्या सोबत झाले. गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय व्यवसायानिमित्त हे दांपत्य शहरात राहत होते. शहरातील खैरी प्लॉट भागात गेल्या चार ते पाच वर्षांपासून दाताचे डॉक्टर गणेश सानप व डॉक्टर मीरा सानप हे दाम्पत्य राहते. त्यांनी आपल्या दवाखान्यातील एक खोली आरामासाठी ठेवलेली आहे. सोमवारी डॉक्टर मीरा सानप यांनी दिवसभर नेहमीप्रमाणे दातांच्या उपचारार्थ दवाखान्यात आलेल्या रुग्णांवर उपचार करुन सायंकाळी त्या दवाखान्यातच आराम करण्यासाठी खोलीत गेल्या त्याच ठिकाणी त्यांनी गळ्यातील ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
