वारजेत व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाला आई बापाकडून अमानुष मारहाण, मुलगा गेला कोमात
प्रतिनिधी: अनिल सकपाळ
पुणे - आपले मुल सद्गुणी व्हावे, घराचे नाव उज्वल व्हावे यासाठी अपवाद वगळता बहुतांशी पालक आग्रही असतात. त्यासाठी प्रसंगी आई वडील मुलांना शिक्षा देखील देतात. मात्र वारजे मध्ये आई वडिलांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मुलावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याची घटना समोर आली आहे. सद्या तो मुलगा कोमात असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिषेक वगारे (वय.१२) असे त्या मुलाचे नाव असून, आई अनिता वगारे आणि वडील गणेश बाळकू रेणुसे (वय.३८ रा.वारजे माळवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी अभिषेक वगारे हा वाईट वळणाला लागला होता. त्याला सिगारेट, गुटखा खाण्याचे व्यसन लागले होते. त्यासाठी तो वडिलांच्या खिशातील, घरातील पैसे चोरी करत होता. याची माहिती त्याच्या आई वडिलांना लागल्यानंतर त्यांनी अभिषेक याला अनेकवेळा समजावून सांगितले. मात्र त्याच्या वागण्यात बदल होत नव्हता. त्याने आपल्या नित्यक्रमात कोणताही बदल केला नाही. उलट त्याने गेल्या काही महिन्यांपासून शाळेत जाणे देखील बंद करत, टवाळखोरी चालू केली.
यानंतर चिडलेल्या आई अनिता गवारे आणि वडील गणेश रेणुसे यांनी शनिवार (दि.२४) फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता त्याला पट्ट्याने आणि हाताने मारहाण केली. यावेळी त्याने पळण्याचा प्रयत्न केला असता, तो घसरून पडून, त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्याच आई वडिलांनी त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यानंतर प्रथमोपचार करून त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र त्याला त्रास होऊ लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, दोन दिवस उपचार करून देखील त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे समोर आल्यानंतर त्याला कोथरूड येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या तो कोमात असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर सद्या आई वडिलांवर वारजे पोलीस स्टेशन मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, पोलीस नाईक अरुण किटे तपास करत आहेत.
